नाती क्षणोक्षणी साथ करत असतात... काही अल्पजीवी, तर काही चिरंतन... काही
प्रेमाची तर काही अशीच... ही नाती सांभाळायची असतात... कुरकूर व्हायला
लागली तर त्यांना स्नेहाचं वंगण घालावं लागतं... तुटेपर्यंत ताणायचं नाही
आणि अगदी सैलही सोडायचं नाही.. हे जमलं की नात्यांचा सुगंध आपलाच...
"प्रत्येक नात्याला एक वय असतं आणि प्रत्येक वयावर एक नातं असतं...'
वाक्य वाचलं आणि इतके विचार मनात आले, खरंच किती खरं आहे हे! प्रथम मनात
आलं नक्की नातं म्हणजे काय? रक्ताचं नातं, जोडलेले नातं, नाळेचं नातं!
आई-मुलाचं नातं जन्मायला आधी नाळ कापावी लागते. त्याआधी ती दोघे एकच
असतात. तिच्याच शरीराचा भाग जो आधी असतो त्याला वेगळे केले, स्वतंत्र
अस्तित्व दिले की "नातं' जन्माला येतं म्हणजे नात्यात एकरूपता, एकजीवता
असते, तर एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले असते आणि अशा दोन
स्वतंत्र बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे नाते. त्यात अलगता, वेगळेपणा असतो
तरीही एकमेकांना सांधणारा एक अदृश्य दुवा असतो. मग तो प्रेमाचा असेल,
समविचारांचा असेल, सहवेदनेचा असेल, सहकार्याचा असेल, कुठलाही असेल त्या
दुव्यालाच आपण नातं म्हणतो ते जन्माला येतं, अशाच एका क्षणी, की ज्यावर
खरं तर आपला कंट्रोल नसतो, जसं मूल जन्माला यावं तसं नातं जन्माला येतं
आणि अशाच एका क्षणी ते पंचत्वात विलीन होतं माणसाच्या मृत्यूसारखं...
फक्त त्या नात्याचं वाढणं, बहरणं, खुरटणं, अकस्मात संपणं, परत
पुनर्जन्मासारखे नव्याने जन्माला येणं आपण बघायचं असतं. काही नाती
अल्पायुषी ठरतात. काही दीर्घायुषी असतात. कित्येकदा त्या नात्याचं नुसतं
वयंच वाढतं. गुणात्मक मूल्य त्याचं काहीच नसतं. त्या उलट अल्पायुषी नातं
शतायुषी समाधान देऊन जातं.
कित्येकदा नातं जन्मापासूनच अशक्त असतं. थोडासा वातावरणात, परिस्थितीत
बदल झाला तरी ते आजारी पडतं. वाटतं, आता काय? पण समजुतीचे टॉनिक औषध
दिलं, की परत मूळ पदावर येतं. काही नाती मुळातच सशक्त असतात. कितीही वादळ
वारे आले, त्सुनामी आली, साथीचे रोग आले, तरी टक्कर द्यायची त्या नात्यात
हिंमत असते. काही नाती "हलकी' वजनरहित असतात. वारा ज्या दिशेने येईल
तिकडे वाहवत जातात, तर काही नात्यांना स्वतःचे "वजन' असते. कितीही
मतमतांतरे झाली, गैरसमजांची वावटळे उठली, तरी ते आपले स्थान सोडत नाही;
पण काही काही वेळेला नाती अपघातात सापडतात. ध्यानीमनी नसताना जरी
स्वतःच्या ड्रायव्हिंगची खात्री असली तरी वेगावर नियंत्रण राहत नाही,
विचार"चक्र' फुटते आणि गाडी भरकटते! कित्येकदा इतरांना ओव्हरटेक करण्याची
क्षमता आहे, असा अवाजवी विश्वास वाटतो; पण एका बेसावध क्षणी समोरून
येणाऱ्या परिस्थितीचा ट्रक आदळतो आणि नात्याला अपघात होतो. कधी तेथेच
प्राणज्योत मावळते, तर कधी ते "आयसीयू'मध्ये जातं...
हृदयाला झालेली जखम गंभीर असते. बराच वेळ लागतो परत नॉर्मल व्हायला आणि
नॉर्मलवर आले तरी कुठंतरी वेदनेचा व्रण राहतोच. परत थोडासा धक्का लागला
तरी ती वेदना बोलायला लागते, हुंदके देते, उसासे टाकते...
मला तरी वाटतं, नात्यानं जन्म घेतल्यावर ते चिरतरुण राहण्यासाठी
सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. रोजचा रियाज, मोकळेपणाची
स्वच्छ हवा, गैरसमजाच्या साथीचा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना,
सहनशक्तीची लस टोचणे आवश्यक आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम
विचारांचा खुराक देणे तितकेच महत्त्वाचे. कोरडेपणा येऊ नये म्हणून
भावनांची शिंपणही हवी. कधीकधी नात्याच्या रोपट्याला अनावश्यक विषयांच्या
फांद्या फुटतात त्या वेळीच छाटून टाकाव्या लागतात म्हणजे मूळ नात्याचा
समतोल ढळत नाही, नात्याचा "बोन्साय' होऊ द्यायचा की नाही आपण ठरवायचं...
थोडक्यात, नवीन जन्मलेले नाते जगवायचं, वाढवायचं, सुदृढ करायचं हे जसं
खरं, तसंच आधी जन्मलेले नातं त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेत टिकवायचं,
फुलवायचं हेही महत्त्वाचं. त्या सगळ्यासाठी करायला हवा "सारासार विचार',
वागणं- बोलणं, आचार- विचार साऱ्यात हवे. "तारतम्य' प्रत्येकानेच स्वतःशी
घेतली पाहिजे एक शपथ नाते जपण्याची!...
नातं कुरकुरायला लागले तर त्याला वेळीच तेलपाणी करायला हवं, ते
तुटेपर्यंत ताणायचं नाही, तसंच अगदी सैलही सोडायचं नाही. संबंधांचा रथ जर
वेगाने धावायला हवा असेल, तर नात्याची प्रत्येचा किती ताणायची नि किती
सोडायची याचे भान ठेवणे महत्त्वाचे! मग नात्यातलं चैतन्य चिरतरुण होते,
संजीवनी मिळाल्यासारखे!