Tuesday, February 28, 2012

भक्ती...

भक्ती...
भक्ती म्हणजे नेमकं काय...
दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक
एक वारी उपवास ...
बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द,
अहंकार, गर्व आणि अट्टाहास...
ही भक्ती नाही... ही आहे सक्ती...
सगळे करतात म्हणून आपणपण करायची सक्ती...
भक्तीत शक्ती असावी.. सक्ती नाही...

कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार देतांना पहावं... जोपर्यंत मडक्याला हवा
तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हाथ त्याला आकार देत असतात... ती खरी
भक्ती...
आईला आपल्या लेकराला गोंजारतांना पहावं .. ती खरी भक्ती...
एखाद्या साधूला बेधुंद होऊन अभंग गातांना पहावं.. ती खरी भक्ती...
चिमणीला आपल्या पिल्लांना भरवतांना पहावं.. ती खरी भक्ती...
'मनापासून' केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भक्ती..

अहो ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन तुम्ही 'हे काम झालं तर १
नारळ फोडीन' म्हणून लालूच दाखवता... सृष्टीच्या निर्मात्यालाच तुम्ही चक्क चार
भिंतीच्या आत कोंडून ठेवता.. वाह रे माणसा ...
भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत... किंबहुना भक्तीला सीमाच नाहीत...
भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो !!!

आपली सावली...

आपली सावली...
पण तिला आपली म्हणणं कितपत योग्य आहे हे मला नाही कळत...
ती सावली... ती आपली नसतेच मुळी... तिचं नातं सूर्याशी.. त्याच्या
प्रकाशाशी... सूर्य डोक्यावर आला की तीही आपल्या पायाखाली कुठेतरी लपून
बसते... आपल्याला चटके खायला एकट सोडून... अन सूर्य अस्ताला आला की ती आपले
पांग पसरते... आपण असतो त्यापेक्षा दुप्पट जागा ती व्यापते... मग तिला आपलं
म्हणावं तरी कसं... ती अंधारात आपली साथ सोडते म्हणतात... अरे पण मी म्हणतो
त्या अंधाराला का उगीच दोष... त्याचा गुणधर्मच तो... आणि सावली तरी नेमकी काय
हो... तो सुद्धा अंधारच... रंगीत सावली पाहिलीये का कधी !!
सगळा आपल्या विचारांचा अंधार...
शेवटी आपलं असतं कोण... कुणीच नाही... आपले आपणच असतो ... बस्स !!!!
 
बेधुंद आणि निरागस जगणं काय असतं हे समजायचं असेल ना तर आपण आपलं बालपण
आठवावं...

तेंव्हा कुठल्याच गोष्टीला 'अर्थ' नसायचा... कुठलीही गोष्ट 'का' करायची हा
प्रश्न नसायचा...

मग ते मातीत/चिखलात खेळणं असो, की मांजरीला जाऊन बेधडक धरणे असो...
घराच्या अंगणात मनसोक्त बागडणं असो की गुढ्ग्याची टोपर फुटूस्तर धडपडण असो...

पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं हे जग आपल्याला अर्थ शोधायची सवय
लावतं... निरर्थक गोष्टींमध्ये अर्थ शोधण्याच्या नादात आपण त्या 'निरागस'
स्वतः ला कुठेतरी हरवून बसतो... मग ही व्यवहारी दुनिया 'फायदा' या शब्दाचा
आडोसा घेऊन त्या 'स्व' मधेच सर्व ‘अर्थ’ आहे हे आपल्या डोक्यात भरवते... इथेच
सगळा घोळ होतो...
कारण जेंव्हा 'स्व' आणि 'अर्थ' हे शब्द जुळतात तेंव्हा त्याचा 'स्वार्थ'
होतो... आणि एकदा स्वार्थ आलं म्हणजे तिथे निरागसतेला स्थान रहात नाही...मग
बाकी गोष्टी तश्यापण निरर्थकच !!!!
 
*जे आपल्याला हवं असतं, ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं, आपल्याला जे आवडतं, ते आपल्याकडे नसतं, कारण जे
आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि प्रेम करतो, याचंच नाव 'आयुष्य'
असतं...!*
 

आठवण ..

आठवण ..
सगळ्यांनाच येते...
मोठ्यांना लहानपणाची अन लहाणांना मोठ्यांची...
बाबांना आपल्या शाळेची... अन पिंकी ला आपल्या आजोबांची...
आईला आपल्या आबांची अन आबांना आपल्या चिऊ ची...
कोणाला आपल्या ताईची तर ताईला माहेरच्या अंगणातल्या जाईची...
हरवलेल्या आपल्या मित्रांची... रंगवलेल्या त्या बेधुंद चित्रांची...
कट्ट्यावर भरवलेल्या त्या सभांची... आनंदात घालवलेल्या त्या क्षणांची...
गर्दीत सुटलेल्या हाथांची... अकारण तुटलेल्या काही नात्यांची...
तिला त्याची अन त्याला तिची...

आठवण...
एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...
आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...

हवेला गंध नसतो..
पाण्याला रंग नसतो..
अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो !!!