Thursday, December 29, 2011

झ-यांनी आजकाल
दगडातून फुटणं सोडून दिलय
पक्षांनिही आजकाल
किलबिलणं बंद केलय
फुलांनी आजकाल
फुलणं’ सोडून दिलय
पावसाने तर आपलं
कोसळणच बंद केलय
त्यांना म्हणे माणसां कडून
उत्तर हवय .. की ही हिरवीगार
जंगलं तुम्ही का तोडलीत...?
" माहितीच्या अधिकाराच्या
कायद्यात तुम्ही बसत नाही"
असं माणूस त्यांना म्हणाल्याचं ऐकतोय..!
" हो पण झाडे तोडणे हा गुन्हा आहे..
असं तुमचा कायदाच सांगतो..ना.."
असे असित्वाने त्याला विचारले
असंही ऐकतोय..!
"हो गुन्हा आहे म्हणून आम्ही त्याचा
दंड ही भरतो.की."
असं माणूस त्यांना म्हणाला,
आणि गुन्हा आहे पाप तर नाही ना..? असेही
माणूस अस्तित्वाला म्हणाला...असं ऐकतोय
तेव्हा मात्र सारा आसमंत खदखदून हसला
आणि म्हणाला "
" बा मानवा तु थोर आहेस!, सर्व शक्तीमान आहेस
जा तुझ्या राज्यावरचा सूर्य कधीच मावणार नाही.."
माणूस आनंदाने निघून गेला..
त्याला वाटलं या प्रकृतीनं आपल्याला
केवढा मोठा आशीर्वाद दिला........!!!??

हारणारे नेहमीच हारत नाहीत...

*हारणारे नेहमीच हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत...
हारणारेही कधीकधी असे उडतात,
की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत...
आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नही पाहत नाहीत...
वेळ बदलते...माणसं बदलतात
पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही...
बदल हेच आयुष्य असतं
हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही...

कशासाठी बी डर्टी..

*कशासाठी बी डर्टी *

वाईट आपला पाठलाग करत राहणार, सावलीसारखं मागं राहणार यात शंका नाही. प्रश्‍न
आहे तो आपण त्याला चुकवू शकतो की नाही? मला वाटतं चुकवू शकतो... प्रचंड गर्दीत
आपण अपघात चुकवत चालू शकतो, मरणाचा पाठलाग चुकवत जगू शकतो, बऱ्याच काही गोष्टी
आपण चुकवत असतो, तसं हे डर्टीही चुकवायला हवं...गटारीत लोळणाऱ्या डुकराशी झुंज
द्यायची म्हटलं की स्वतः गटारीत उतरावं लागतं आणि जेवढी डुकराशी झुंज देऊ
गटारीत राहू, तेवढं डुकरालाच बरं वाटतं... आणि आपलं सारं खराब व्हायला
लागतं... डर्टीबरोबर झुंजायचं तर डर्टी व्हावं लागतं... आपण स्पर्श कुणाला
करणार आहोत? चंदनाला की डुकराला, हे ठरवायचा अधिकार तर आपल्यालाच आहे...

अलीकडं पंधरा-वीस दिवसांपासून टीव्हीचं बटण ऑन करताना थोडी धास्तीच वाटते.
त्याचं कारणही आहे. कोणता तरी एक सिनेमा झळकलाय. त्यानं बॉक्‍स ऑफिसवर धंदाही
केलाय. या सिनेमाची एक जाहिरात बहुतेक चॅनेलवर झळकतेय. मीही एकदा ती पाहिली
आणि धक्काच बसला. बी डर्टी... अशी जाहिरात आहे. हे वाक्‍य वारंवार येतंय आणि
जणू हात जोडून विनंती केल्याप्रमाणे बोलतंय- "भाईयो, बहनों और बच्चे लोग, बी
डर्टी...' बाप रे बाप! हे कसं काय वाचायचं?... घाणेरडे बना असा संदेश
जाहिरातीसाठी तयार केला गेलाय... मुळातच आपण पर्यावरणात तयार होत असलेल्या...
मूल्य आणि संस्कार यांच्या ऱ्हासातून तयार होत असलेल्या घाणीत अडकतोय की काय,
असं वाटत असतानाच ही जाहिरात झळकतेय... बी डर्टी... बी डर्टी आणि बी डर्टी...
काही वर्षांपूर्वी "जागते रहो'सारखे संदेश मिळायचे, स्वच्छ राहा, असे संदेश
मिळायचे आणि आता एकदम यू टर्न... स्वच्छतेकडून घाणीकडे... घाणेरडे बना... आता
घाणेरडं बनायचं तर वर्तन, व्यवहार तसा करायचा किंवा दारात अनियमित येणाऱ्या
घंटागाडीत लोळायचं... एकीकडं सरकारी चॅनेलमधून स्वच्छतेचा मंत्र आळवला
जातोय... दिवसातून किमान आठ-दहा वेळा तरी हात स्वच्छ केले पाहिजेत, अशा
सांगणाऱ्या जाहिराती आहेत... न धुतलेल्या हाताच्या एका रंध्रावर लाखो जिवाणू
बसतात, असं सांगितलं जातंय... तात्पर्य, जो वारंवार हात धुवत नाही तो
असंस्कृत... स्वच्छता हा सुंदर संस्कार. स्वच्छतेमुळे आरोग्य लाभते आणि
आरोग्यामुळे आयुष्य लाभते. स्वच्छतापुराण जसं ताणू तसं हॅंड लिक्विडच्या खपाचे
आकडेच्या आकडे दिसतील. स्वच्छतेमुळे प्रतिष्ठाही लाभते. नॅपकिनही खपतात.
शरीरालाही ते चांगलं असतं. एकीकडे स्वच्छतेसाठी प्रचार, प्रयोग चालू आहेत...
ग्रामपंचायतीपासून ते थेट जगाची कचेरी असलेल्या युनोपर्यंत... पण मध्येच हा
सिनेमा आला आणि एकदम या स्वच्छतापुराणाची वाटच लागली... घाणेरडे बना! खरं तर
आपण स्वतः जमेल त्या मार्गानं स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करीत असतो...
स्वच्छतेमुळे सौंदर्य लाभतं, सौंदर्याला देवत्व लाभतं, काय काय करून आपण
स्वतःसह सारा समाज स्वच्छतेकडं नेत होतो आणि एकदम घाणेरडं होण्याचा मंत्र
कोणीतरी पडद्यावरून देऊ लागलं... हा सिनेमा पाहून आलेल्या तरुणांच्या
प्रतिक्रियाही ऐकण्यासारख्या आहेत. "अरे मैंने डर्टी देख लिया। बहुत अच्छा
है... डर्टी देखो यार' वगैरे वगैरे...' एके काळी डर्टी शब्द उच्चारताना संकोच
वाटायचा आणि आता हा शब्द जणू समाजमान्य आणि संस्कारमान्य बनवला जातोय...
निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं जाण्याऐवजी निगेटिव्हकडून निगेटिव्हकडं जाण्याचा
म्हणजेच घाणीकडून घाणीकडं जाण्याचाच हा प्रकार आहे... जाहिरातीचं एक जबरदस्त
तंत्र आहे. लोकांना स्वच्छ व्हा, असं सांगितलं की ते कदाचित ऐकणार नाहीत; पण
घाणेरडं व्हा म्हटलं, की त्यांना स्वच्छतेची जाण येईल... स्वच्छ व्हायचं याचाच
अर्थ घाणमुक्त व्हायचं... स्वच्छता तेव्हाच कळते, जेव्हा पाचों उंगलियां घाणीत
अडकतात... खोटं बोला असं शिकवलं, की लोकांना खऱ्याचं महत्त्व कळू लागेल, चोरी
करा असं सांगितलं, की कष्टाचं महत्त्व कळलं आणि खून करा म्हटलं की जगण्याचं
महत्त्व कळेल... वा रे वा! काय भारी सिद्धान्त आहे, नाही? त्याचा संबंध
मूल्याशी नाही तर गल्ल्याशी आहे. गल्ला म्हणजे पैसे ठेवण्याची किंवा
वाढविण्याची जागा... गल्ला वाढविण्यासाठी मूल्यं नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे
का, असं जर कोणी विचारलं की उत्तर येईल, "काहीतरी संपल्याशिवाय काहीतरी
निर्माण होत नाही.' आपण काय संपवायला निघालो आहोत? काय शिकवायला निघालो आहोत?
उजेडाचा तिरस्कार, स्वच्छतेचा तिरस्कार, सत्याचा, मूल्याचा तिरस्कार तरी शिकवत
नाही आहोत? कोणतं हे मार्केट तयार होतंय, की जेथे डर्टी सजवून ठेवलं जातंय आणि
स्वच्छतेला लाथ घातली जातेय... एकदा कपड्यांच्या दुकानात गेलो होतो. थोड्या
वेळानं एक कुटुंब तिथं आलं. सेल्समन काय पाहिजे विचारू लागला. कुटुंबानं
आपल्यातल्या लहान मुलाला प्रथम विचारलं, ""बेटा, तुला काय हवंय?''

बेटा हसत म्हणाला, ""पप्पा, मम्मी, ये अंदर की बात है...''

त्याला अंडरवेअर हवी होती. कोठून तरी म्हणण्यापेक्षा कुठल्या तरी छोट्या
पडद्यावर त्यानं हे वाक्‍य ऐकलं असावं... पाहिलं असावं. त्याच्या उत्तरावर
सारं दुकान हसलं. आई-वडिलांना राग नाही आला. उलट "किस का बेटा है' अशा एका
स्वाभिमानी भावनेनं ते आपल्या मुलाकडे बघू लागले... त्याच्या डोक्‍यावरून हात
फिरवू लागले.

कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील... प्रत्येकाकडे यापैकी काही ना काही अनुभव
असेल... कोणी बोलतं, कोणी बोलत नाही...

छोटा पडदा नुसताच बोलत नाही, तर काही गोष्टी पाठ करून घेतो... पाठ होईपर्यंत
आपला मूळ मेंदू सपाट करू लागतो. मग कधी डाग अच्छे लगते है म्हणत डागाचे, तर
कधी डर्टीचे उंचवटे मेंदूत तयार करू लागतो....सगळंच उलटं वाटू
लागलंय...ज्यांना उलटं वाटतं किंवा प्रसंगी उलट्याच होतात, तेव्हा त्यांना
घाणीचं समर्थन करणारी व्यवस्था कालबाह्य ठरवते. कुणा खानाचा डायलॉग मारते, "अब
सब डर्टी है... दुनिया डर्टी है... जिंदगी भी तो एक डर्टी है, रास्ता डर्टी
है, आदमी डर्टी है वगैरे वगैरे...' डाग ही घालवायची किंवा संपवायची गोष्ट
होती; पण ती मिरवायची झाली... "डर्टी' ही गोष्टही संपवायची होती ती आता
सजवायची झाली आहे. या सगळ्या व्यवहारातून जन्माला येणारी भाषाही मोठी मजेशीर
असते. माझा पोरगा म्हणाला, ""अरे, दोनशे रुपये दे पप्पा. थोडं डर्टी बघून
येतो...''

त्याचं ऐकून शुगर एकदम टॉपला जाण्याची वेळ आली. त्यातूनही मी म्हणालो, ""अरे,
त्याला ए सर्टिफिकेट आहे.''
यावर तो म्हणाला, ""मी एटीन प्लस आहे...''
एकूण काय, तर डर्टी पाहण्यासाठीची पात्रताही त्यानं मिळवलेली असावी.

काळ बदलतोय... पण कोणत्या अंगानं, ते महत्त्वाचं आहे. मला तर नेहमीच वाटत
आलंय, की आपण अतिशय कष्टानं जपलेलं, उपाशीपोटीही जपलेलं असं काहीतरी तो काळ
ओढून घेतोय... हिसकावून घेतोय... गमावतोय आपण काहीतरी... प्रतिकार कसा
करायचा?... एखाद्यानं एखाद्याला सांगितलं, की अमुक अमुक गोष्ट वाईट आहे, ती
बघू नकोस. तर उत्तर मिळतं, की ठीकंय. वाईट कशी आहे ती बघून घेतो. नंतर बघत
नाही. पण वाईट सारं अनुभवातूनच समजून घ्यायचं का?...

गेल्या आठवड्यात मी "एसबीआय'च्या एका ए.टी.एम.समोर उभा होतो. रांगेत उभा होतो.
आत एक परदेशी नागरिक होता. तो बाहेर आला आणि म्हणाला, ""एटीएममध्ये पैसे
नाहीत. तशी स्लिप बाहेर पडतेय. कृपा करून जाऊ नका... वेळ वाया घालवू नका.''

रांगेतल्यांनी ते ऐकलं आणि तरी ते आत निघाले ते पैसे कसे येत नाहीत, हे
पाहायला...

वाईट आपला पाठलाग करत राहणार, सावलीसारखं मागं राहणार, यात शंका नाही. प्रश्‍न
आहे तो आपण त्याला चुकवू शकतो की नाही? मला वाटतं चुकवू
*जे आवडत असत
ते कधी मिळत नसत
हिसकावून घेऊन ते आपल कधी होत नसत
प्रयत्न केला मागण्याचा पण यश मागून मिळत नसत
शेवटी नशिबात आहे तेच होते म्हणून नशीब खोटे आहे असे माणूस म्हणत नसतो
जिंकण्यासाठी प्रयत्न प्रत्तेकाकडे असतो
म्हणून प्रयत्न तो कधी सोडत नसतो .*

मैत्री म्हणजे काय असतं ?

मैत्री म्हणजे काय असतं ?

मैत्री म्हणजे ,
मनाला जोडणारी Wire असतं,

अंधारात प्रकाश देणारा Light असतं.

हृदयातलं ऐकवणारा Receiver असतं,

संकटकाळी मदतीच Transmitter असतं……….

मैत्री म्हणजे ,
वार्‍यावर डूलणारा Rose असतं,

गीटारीची सुंदर Tune असतं.

जीवनाच्या प्रवासातील Mentor असतं,

योग्य वाटेवर आणणारं Steering असतं………

मैत्री म्हणजे,
विचारांच्या धाग्यांच Blanket असतं,

रंग वेगवेगळे तरी Picture एकच असतं.

जिथे रक्ताच Relation ही परकं असतं,

आणि नेहमीच बोलकं Heart असतं.…… ♥

Friday, December 2, 2011

प्रेम आणि वेडेपणा

खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि मानवाने
या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडे तिकडे
फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.

एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना खूपच
कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती म्हणाली, "आपण
सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा
'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे लागण्या एवढं कुणी
वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. 'वेडेपणा' एका
झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........ एक, दोन, तीन..............

वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला गेले.
'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या ढिगात लपला.
'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली
लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला.
'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ' एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते
पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच होता...... ७९, ८०, ८१, ८२......

बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम' मात्र
कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात आपल्याला याचं
आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम' लपवता येतचं नाही.
'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७.... शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची
वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला
लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय! मी येतोय!"

'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच त्याला
'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात
नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या तळातून त्याने
'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून काढली. एकापाठोपाठ
एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून
'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा' ने, त्याला शोधता येत नाही या
मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा' ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत
नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 'वेडेपणा' ने एक लाकडाचा
धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा....
अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या
किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या
बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा'
ने त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू
लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता
मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?

प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर
माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता दाखव."

तेव्हापासून प्रेम आंधळ झालं आणि वेडेपणा त्याचा नेहमीचा सोबती झाला
 

सांग ना ..

सांग ना ..
समुद्रात तळाशी रंगीबेरंगी मासे
सुखनैव तरंगतात
तसं तुझं असणं माझ्या मनातले
न्याहाळत बसते मी ....
म्हणून ओठांवर नकळतपणे
फुलणारं हसू मात्र
कुणापासून कसं लपवावं
समजेनासे होते कितीदा...
आणि ओठांवरचे हसू
लपवून ठेवावं तर
डोळ्यात तरी ते उमटतेच आणि..
...अशावेळी काय करायचे असतं?
एवढंच नव्हे तर मनात उमटलेला
हा रोमांच त्याचं काही कराव तर ..
गालावर उमटलेल्या
गुलाबी रंगाचा काय रे?...
तुझ्या विरहाच्या गुलाबी काट्याने
घायाळ तरारलेला रक्तबिंदू
त्याची लाली तरी किती अन
सांग ना कशी झाकायची.....
 

आकाशातला एक तारा आपला असावा

*आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी *
*

गुगल वर शोधताना




गुगल.कॉमवर आपण बर्‍याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि
आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर अनेक (हजारो) वेबसाईटची
यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे



सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो.
मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो.

कधीकधी
गुगल.कॉमचा हाच स्वभाव अनेकांना आवडत नाही. विचारलेल्या माहितीची असंख्य
पाने दाखविल्यावर त्यांना राग येतो. यावेळी गुगल.कॉमला नावे ठेवण्यापेक्षा


आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर
शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो.

गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो.




१. आपल्या प्रश्नामध्ये ' + ' चिन्हाचा वापर करावा : समजा गुगल.कॉमवर
आपणास मोबाईलची हिस्ट्री (म्हणजेच मोबाईलचा इतिहास) शोधायचे असल्यास
गुगल.कॉम ' Mobile + History ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम
हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.



२. आपल्या प्रश्नामध्ये ' - ' चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास
गुगल.कॉमवर 'sachin' असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये 'sachin
tendukar' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील.
अशावेळी गुगल.कॉमला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर


'sachin -tendukar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल.कॉम
येणार्‍या उत्तरामध्ये 'tendukar'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी
दाखवेल.

३.
आपल्या प्रश्नामध्ये ' ~ ' चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादी माहिती
शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती
पाने देखिल गुगल.कॉम दाखवितो.



४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच
वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीह एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची
सोय उपलब्ध नसल्यास गुगल.कॉमवर त्या वेबसाईटचे नाव आणि
आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल.कॉम फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती


शोधून उत्तर देतो. उदा. ' site:www.abc.com mobile ' असे दिल्यास गुगल.कॉम
फक्त http://www.abc.com/ वर mobile हा शब्द शोधेल.


५.
एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचे असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा
अर्थ हवा असल्यास गुगल.कॉम त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास
गुगल.कॉम त्या शब्दाची माहिती असलेल्याच


वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ' define:Computer ' असे शोधल्यास गुगल.कॉम
' Computer ' या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

६.
मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट
त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमूळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच
इतरही त्या विषयीच्या आणि त्याच


प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का? ते शोधण्यासाठी ' related: '
या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.xyz. com/ ' असे
शोधल्यास गुगल.कॉम ' http://www.xyz.com/ ' प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची



यादी देईल.

७. जसाच्यातसा शब्ध शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द
गुगल.कॉमवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि
मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच
" " याचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर "contact us" असे शोधल्यास ज्या


पानावर हे दोन्ही शब्द एखत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.

८.
आपल्या प्रश्नामध्ये ' * ' चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादा शब्द
शोधताना तो शब्द पुर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधीत इतरही
शब्द सापडल्यास ती देखिल दाखवावी असे आपणास


जेव्हा हवे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर '
friend* ' असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends , friendship या
त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखिल उत्तरामध्ये विचार करतो.




९. आपल्या प्रश्नामध्ये ' ? ' चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची
पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? ' चिन्हाचा वापर करावा. उदा. ' fri??d '
असे सर्च केल्यास गुगल.कॉम त्या प्रश्नचिन्हाच्या
जागी योग्यती अक्षरे घेवून त्या माहितीची पाने दाखवितो.



१०. आपल्या प्रश्नामध्ये ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा : एखाद्या
वेळेस जर आपणास दोन शब्दाना मिळून एकत्रिच सर्च करायचे असते त्या वेळी '
AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल.कॉम मध्ये सर्च


करताना ' Mobile or Books ' सर्च केल्यास गुगल.कॉम ज्या पानावर या दोन्ही
शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND '
शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.